दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा कोरोनाला पाच महिने दे धक्का! पाच महिन्यांत एकाही मुलाचा मृत्यू नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आली असताना कोविड व्हेरिएंट ओमायक्रोनच्या स्वरूपात तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी गेल्या पाच महिन्यांत दहा वर्षांपर्यंतच्या एकाही मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांत 37 हजार 877 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण 711 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यामध्ये दहा वर्षांपर्यंतच्या 1439 मुलांना कोरोनाची लागण झाली असली तरी एकही मृत्यू झालेला नाही.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट सद्यस्थितीत पूर्ण नियंत्रणात आली असली तरी ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे पालिका आणि राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. 21 डिसेंबरपर्यंत मुंबईत ओमायक्रोन रुग्णांची संख्या 31 वर गेली असून राज्यातील ओमायक्रोन रुग्णांची संख्या 65 वर गेली आहे. ओमायक्रोन डेल्टापेक्षा घातक नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रसाराचा वेग सर्वाधिक असल्याने खबरदारी घेणे अनिवार्य आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार लहान मुलांनमध्ये असलेल्या प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाचा सामना यशस्वीरीत्या करू शकत असल्याचे आरोग्यतज्ञांचे म्हणणे आहे.

20 डिसेंबर रोजीची आकडेवारी

  • 0 ते दहा वर्षे वयोगटातील एकूण बाधित ः 14494
  • मुलांचे प्रमाण 55 टक्के, मुलींचे प्रमाण 45 टक्के
  • एकूण मृत्यू 19

14 जुलै रोजीची आकडेवारी

  •  0 ते दहा वर्षे वयोगटातील एकूण बाधित – 13055
  • मुलांचे प्रमाण ः 55 टक्के, मुलींचे प्रमाण – 45 टक्के
  • एकूण मृत्यू – 19

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड

  • आतापर्यंतचे एकूण बाधित – 7 लाख 67 हजार 658
  • आतापर्यंत डिस्चार्ज झालेले – 7 लाख 76 हजार 555
  • सद्यस्थितीमधील सक्रिय रुग्ण – 2159
  • आतापर्यंत कोरोनामुळे एकूण मृत्यू – 16 हजार 366