प्राण्यांसाठी मालाडमध्ये 100 बेडचे रुग्णालय; अद्ययावत सुविधा, कोंडवाडा, दर्जेदार उपचार

मुंबईतील पाळीव आणि भटक्या प्राण्यांसाठी मालाडमध्ये 100 बेडचे अद्ययावत सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महानगरपालिका आणि श्रीमद् राजचंद्र जीवदया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खासगी तत्त्वावर या पशुवैद्यकीय रुग्णालयाची निर्मिती होणार असून पुढील दोन वर्षांत हे रुग्णालय कार्यान्वित होईल.

प्राणी कल्याणाच्या उद्देशाने पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पाळीव व भटके श्वान, गुरे-ढोरे, प्राणी व पक्षी यांच्यावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्याच्या हेतूने या अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थापना करण्यात येत आहे.

अशा राहणार सुविधा

मालाड येथे एकूण 2 हजार 240 चौरस मीटर क्षेत्रफळ जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये पशूंवर उपचारासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 100 बेड, अत्याधुनिक रोग निदानासाठी एक्सरे, एमआरआय; अत्याधुनिक शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग; लहान प्राण्यांसाठी विशेष उपचार सुविधा यांचा समावेश असेल.

कोंडवाडाअंतर्गत पकडण्यात आलेल्या भटक्या जनावरांचे संगोपन आणि त्यांची देखभाल येथे करण्यात येईल आणि त्यांच्यावर उपचारांसाठी सुविधा उपलब्ध असतील. तसेच, लहान प्राणी दहन भट्टी देखील या ठिकाणी उपलब्ध असेल अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.