देशात दरवर्षी मारले जातात 100 हत्ती, एकूण संख्या फक्त 28 हजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

केरळ येथील गर्भवती हत्तिणीच्या मृत्युमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अननसात फटाके भरून ते खायला दिल्याने त्याचा स्फोट होऊन तिचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अजून एक धक्कादायक परिस्थिती उघड झाली आहे. देशात दरवर्षी 100 हत्ती मारले जातात, असा खुलासा एलिफंट टास्क फोर्सने केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एलिफंट टास्क फोर्सचे अध्यक्ष प्राध्यापक महेश रंगराजन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दरवर्षी देशात 100 हत्ती मारले जातात. आजघडीला देशात फक्त 28 हजार इतकेच हत्ती उरले आहेत. याचं सर्वात मोठं कारण हस्तिदंताची तस्करी हे आहे. तस्कर हत्तींना मारून त्यांच्या दातांची विक्री करतात. हे दात परदेशातही विकले जातात आणि त्यांची किंमत लाखोंच्या घरात असते, अशी माहिती रंगराजन यांनी दिली आहे.

या हस्तिदंतापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. माणसाचा नकली दातही बनवला जातो. हस्तिदंती दागिन्यांनाही मोठी मागणी असते. प्लास्टिकची निर्मिती होण्याआधी बिलियर्ड खेळातील चेंडू, पियानोच्या पट्ट्या, बॅगपाईप नावाचं वाद्य, बटण किंवा गुंड्या अशा विविध कारणांसाठी हत्तीचा दात वापरला जात असे. आता इतर पर्याय उपलब्ध झाले तरी हस्तिदंताची मागणी घटलेली नाही. त्यामुळे हत्तीचा एक दात एक लाखाहून अधिक किमतीला विकला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर हस्तिदंताच्या वापराला आणि विक्रीला प्रतिबंध करण्यात आला असला तरी छुप्या मार्गाने त्याची तस्करी होत असते, असंही रंगराजन यावेळी म्हणाले.

हत्ती या प्राण्याविषयी अधिक माहिती देखील रंगराजन यांनी दिली. ते म्हणाले, मूलतः हत्ती हा अतिशय शांत आणि सालस प्राणी आहे. तो स्वतःच मानवी वस्तीपासून दूर राहणं पसंत करतो. पण, कधीकधी तहानभुकेने व्याकुळ झाला तर कधीतरी मानवी वस्तीत येतो. या हत्तींना वाचवण्याची जबाबदारी सरकारइतकीच सामान्य जनतेची देखील आहे, असंही रंगराजन यांनी यावेळी स्पष्ट केलं.