एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटांचा खडखडाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एटीएममधून शंभर रुपयांच्या नोटा हव्या असतील, पण मशीनमधून केवळ 500 आणि दोन हजारांच्याच नोटा मिळत आहेत. अनेक बँकांच्या एटीएममध्ये हाच अनुभव येत असेल तर हा बँकेचा दोष नाही. यामागे 100 रुपयांच्या नोटांचा आकार हे तांत्रिक कारण आहे. शंभरच्या नव्या नोटांचा आकार हा लहान आहे तर जुन्या नोटा आकाराने मोठय़ा आहेत. एटीएममध्ये या दोन्ही आकारांच्या नोटा ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा असते. पण कोणत्या एटीएममध्ये नवीन किंवा जुन्या नोटा ठेवण्यासाठी जागा आहे याची यादीच एटीएम ऑपरेटर्सकडे नसल्याने सध्या या नोटांचा तुटवडा भासत आहे.

100 रुपयांच्या नवीन आणि जुन्या नोटा ठेवण्यासाठी एटीएम मशीनमध्ये स्वतंत्र कॅसेटस् आहेत, मात्र एटीएम कॅश व्हॅन्समधील ऑपरेटर्सकडे तशी यादीच उपलब्ध नसते. त्यामुळे एटीएममध्ये जुन्या नोटा ठेवायच्या की नवीन नोटा हे ठरवता येत नाही. अनेकदा बँकांकडेही 100 रुपयांच्या नोटाच उपलब्ध नसल्याने एटीएममध्ये या नोटांची टंचाई भासते.

  • देशातील एकूण 2.4 लाख एटीएमपैकी केवळ 20 ते 25 टक्के एटीएममध्येच नव्या नोटा लोडिंग होतात. उर्वरित एटीएममध्ये जुन्या नोटाच टाकल्या जातात. त्यामुळे एटीएम ऑपरेटर्ससाठी कोणत्या एटीएममध्ये किती नोटा टाकायचा हा प्रश्न असतो.