आयआयटी मुंबईला एक हजार कोटींचे अनुदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशात नवीन तंत्रज्ञानासाठी आयआयटी मुंबई सतत नवनवीन संशोधन करीत आहे. संशोधनाच्या क्षेत्रातील अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईला एक हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत केली.

आयआयटी मुंबईच्या ५६ व्या पदवीदान सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी मुंबईत होते. या सोहळ्यात मोदींच्या हस्ते तीन विद्यार्थांना सुवर्णपदक तर ४३ विद्यार्थ्यांना रौप्यपदक प्रदान करण्यात आले. या पदवीदान सोहळ्यात मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात खुदीराम बोस यांना श्रद्धांजली अर्पण करून केली. खुदीराम बोस यांनी देशासाठी त्यांचे सर्वस्व पणाला लावले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली, पण आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देण्याची संधी मिळाली नाही. मात्र स्वातंत्र्यमुक्त देशासाठी आपण भरीव कामगिरी करू शकतो.

आयआयटी मुंबईच्या कार्याचा गौरव करताना या संस्थेला संशोधन क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, आयआयटी मुंबई ही संस्था जगातील अतिशय मोठा ब्रँड आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे देशात नवीन क्रांती झाली आहे. स्टार्टअप्सच्या युगात आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे स्थान आहे. देशात नवीन तंत्रज्ञानासाठी काम करणाऱ्या ज्या काही मोजक्या संस्था आहेत त्यात आयआयटी मुंबईचे स्थान अग्रभागी आहे. आजघडीला देशासमोर ऊर्जासंवर्धन व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा वेळेस आयआयटीच्या विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी आहे आणि या संस्थेचे विद्यार्थी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास यावेळी मोदी यांनी व्यक्त केला. आयआयटी आता इंडिया इन्स्टमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन बनले आहे. या माध्यमातून होणारा बदल हा देशाला प्रगतिपथावर घेऊन जाईल. जगातील विविध स्टार्टअप्समध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा वाटा मोठा असल्याचे मोदी म्हणाले.