एका मिनिटात 109 पुशअप्स! मणिपूरच्या निरंजॉय सिंगची विश्वविक्रमी कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील 24 वर्षीय युवक थौनाओजम निरंजॉय सिंग याने एका मिनिटात सर्वाधिक पुशअप (फिंगर टिप्स) करण्याचा नवा गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड बनवला आहे. यापूर्वी दोन वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक असलेल्या निरंजॉय सिंगने एका मिनिटात 109 पुशअप करून 105 पुशअपचा जुना विक्रम मोडला.

ब्रिटनच्या ग्रॅहम माली याने 13 वर्षांपूर्वी सर्वाधिक पुशअप्सचा रेकॉर्ड केला होता तो निरंजॉय सिंगने मोडला आहे. निरंजॉय इंफाळच्या पश्चिमेला असणाऱया नारन कोंजिन ममंग लीकाई भागात राहतो. त्याच्या वडिलांचे नाव थौनाओजम राजेन सिंह आहे. 2019 मध्ये निरंजॉयने एका मिनिटात सर्वाधिक आर्म लेग पुशअपचा विश्वविक्रम तोडला होता. त्यानंतर त्याने 2020 साली त्याने एका मिनिटात सर्वाधिक हॅण्ड नकल पुशअप्सचा रेकॉर्ड केला होता. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी निरंजॉयचे अभिनंदन केले आहे. एका मिनिटात विश्वविक्रम करणाऱया निरंजॉयची अविस्मरणीय शक्ती बघून आश्चर्यचकीत व्हायला होतं. त्याच्या यशाबद्दल अभिमान वाटत आहे, असं ट्विट रिजीजू यांनी केले आहे. एज्टेक स्पोर्टस् मणिपूर या संस्थेद्वारे एज्टेक फाईट स्टुडिओमध्ये या विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरंजॉयच्या नव्या विक्रमाची पडताळणी करण्यासाठी पुशअप्सचा व्हिडीओ लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱयांना पाठवण्यात येणार आहे.