
आधुनिक काळातही समाजात एकत्र कुटुंब पद्धतीची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याचे दिसून येत असून सार्वजनिक उपक्रमांद्वारे मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचा जागर देखिल सुरु आहे. संगमेश्वर तालुक्यातील कडवई पाटीलवाडी येथील पाच जाधव कुटुंबियांनी त्यांची एकत्र कुटुंब पद्धतीची तीन पिढ्यांपासून सुरु असलेली तब्बल 109 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आजही जपली आहे.
समाज प्रबोधनासह विविध उपक्रम राबवित ते आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करीत आहेत. यंदा वेगळेपण जपणाऱ्या या कुटुंबाने 21 दिवसांच्या त्यांच्या गणेशोत्सवात साडेचार फुटांची भव्य देखणी गणेश मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती सारेगम लिटिल चॅम्पचे प्रसिद्ध गायक प्रथमेश लघटे यांच्या आरवली येथील कलाश्री गणेश मूर्ती केंद्रात साकारण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी नाविण्यपूर्ण सजावट हे या बाप्पाचे वैशिष्ट्य असते.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या आजोबांपासून सुरू असलेली परंपरा जप्त मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. पूर्वी त्यांचा गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत असायचा. मात्र 2016 साली त्यांच्या गणेशोत्सवाला 100 वर्ष पूर्ण झाल्याने या कुटुंबियांनी वेगळेपण जपत 21 दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली. या दिवसात ते विविध प्रकारचे प्रबोधनात्मक धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करतात.
यंदा 21 दिवसाच्या गणपतीचे 23 वे वर्ष असून भजन नृत्य, कलाविष्कार, कीर्तन यासह 21 दिवसांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रनांचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाच्या २१ व्या दिवशी जाखडी नृत्य शक्ती-तुरा यासह सत्कार, नहाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शिवसेना नेते आ. भास्कर जाधव, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहाणार आहेत. याच दिवशी रात्री ११ वा. शाहीर रत्नाकर महाकाळ, पुनम आगरकर यांच्या शक्ती-तुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव, कल्याण शिवसेना उपशहर प्रमुख विश्वनाथ जाधव, सूर्यकांत जाधव, प्रभाकर जाधव, गाजी उपसरपंच संतोष जाधव, गाजी तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र जाधव, जगन्नाथ जाधव, सचिन जाधव, शांताराम जाध्व आदी मंडळी गणेशोत्स्व काळात संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतात.