दहावीच्या विद्यार्थ्यांना उर्त्तीर्ण कसे करणार? शिक्षण विभागाच्या बैठकीत फक्त चर्चाच

दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि अकरावीच्या सीईटी सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आढावा बैठक पार पडली. मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे या बैठकीत न आल्याने बैठक केवळ चर्चेपुरती मर्यादित राहिली.

राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर काल ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचा जीआर काढण्यात आला, मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचे धोरण अद्यापही स्पष्ट नाही. सीबीएसईने मूल्यांकन पद्धती आणि त्यासाठीचे धोरण जाहीर केलेले असताना राज्य शिक्षण मंडळाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल आज बरीच मोठी चर्चा झाली, मात्र या चर्चेत कोणताही सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही.

नुकत्याच केलेल्या दोन सर्वेक्षणात 32 टक्केहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याला विरोध केला आहे, तर 18 टक्के अधिक शाळांनी अंतर्गत मूल्यमापन करण्याची तयारी दर्शवली नाही. यामुळे या सर्वेक्षणाचा आधार घेत धोरण ठरविले तर यातून अनेक तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरतील अशी भीती शिक्षण विभागाला वाटत असल्याने यावर इतर काय पर्याय शोधता येतील यासाठीची चाचपणी शिक्षण मंडळाच्या बैठकांमधून केली जात असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या