
दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱया अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षांत प्रत्येकी 1 लाखाप्रमाणे हे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ‘बार्टी’मार्फत सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱया पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. या योजनेसाठी उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे बंधनकारक आहे.































































