शीवमध्ये 11 लाख रुपये पकडले

सामना प्रतिनिधी, मुंबई

शीवमध्ये बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने 11 लाख 85 हजार बेहिशेबी रक्कम पकडली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या मोटारीवर ‘इंटरनॅशनल ह्युमन राईट कौन्सिल सेक्रेटरी’ असा बोर्ड लावला होता.

हल्ली मोटारींवर प्रेस, ह्युमन राईट कमिशन असा बोर्ड लावून फिरण्याचे प्रकार वाढले आहेत. तशाच प्रकारचा बोर्ड एका मोटारीवर लावला आहे. त्यामुळे संशय अधिकच बळावला. त्यामुळे शीव-कोळीवाडा परिसरात रात्री आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने शीव रुग्णालयाजवळ तपासणी मोहिमेत लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर या मोटार (क्रमांक एमएच 47 एबी 6559) थांबवली. या गाडीत दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह हे तीन इसम होते. त्यांच्याकडे 11 लाख 85 हजार रुपयांची रोकड सापडली.

याबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले असून आयकर विभागाचे उपआयुक्त अधिक चौकशी करीत आहेत, अशी माहिती दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली.