पाकिस्तानच्या बाजोडमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 11 पोलिसांसह एका चिमुरडीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजोड जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत भीषण आत्मघाती हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात 11 पोलीसांना शहीद झाले असून, स्फोटाच्या तीव्रतेमुळे एका निष्पाप मुलीचाही मृत्यू झाला आहे. या घटनेत महिला आणि मुलांसह अन्य सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (ISPR) दिलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी रोजी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या हल्लेखोरांनी बाजोड जिल्ह्यातील एका संयुक्त सुरक्षा चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये 12 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीच्या भिंतीवर आदळले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे चौकीची इमारत कोसळली आणि त्याखाली दबून 11 जवानांचा मृत्यू झाला.

या स्फोटाचा फटका परिसरातील रहिवासी घरांनाही बसला आहे. स्फोटामुळे झालेल्या घरांच्या पडझडीत एका मुलीचा मृत्यू झाला, तर सात नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आयएसपीआरने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, दहशतवाद्यांचा हा प्रयत्न त्यांच्या हताशपणाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून सुरक्षा दलांकडून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.