दंडवसुलीसाठी आधी फोन, मग घरी धडक;ई-चलन वसुलीसाठी वाहतूक पोलिसांच्या 11 टीम तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई–चलनच्या दंडवसुलीसाठी आता मुंबई वाहतूक पोलीस हे घरोघरी जाणार आहे. त्यासाठी वाहुतक पोलिसांच्या 11 टीम तयार केल्या आहेत. ज्याच्यावर ई–चलन आहे त्यांना दंड भरण्यासाठी वाहतूक पोलीस विनंती करणार आहेत. तसेच ज्यांना आपला नंबर अपडेट करायचा असल्यास तेदेखील काम वाहतूक पोलीस करणार आहेत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अधिक कारवाई करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ई–चलन पद्धत अद्ययावत केली. पावती पुस्तकाऐवजी पोलिसांकडे ई–चलन मशीन आल्या. चार वर्षांपूर्वी ई–चलनला मुंबईत सुरुवात झाली. ई–चलनमुळे पारदर्शकता येत चिरीमिरीचे प्रकार कमी झाले आहेत. मात्र स्वतःहून ई–चलनचा दंड भरण्यास पुढे येणाऱ्यांची संख्या कमी आहे.

मुंबईत आतापर्यंत 29 लाख ई–चलनद्वारे दंडवसुली झालेली नाही. सुमारे 300 कोटी रुपये ही दंडाची रक्कम आहे. याबाबत नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख व गृहराज्यमंत्री यांच्या सोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ई–चलनबाबत चर्चा झाली. त्यानुसार ई–चलनचा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या 11 टीम केल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन पोलीस कर्मचारी असणार आहेत. ते घरोघरी जाऊन नागिरकांना दंड भरण्यासाठी विनंती करणार आहेत. रोख स्वरूपात पोलीस दंड आकारून त्याची पावती दिली जाणार आहे.

 ई–चलनच्या दंडवसुलीसाठी वाहतूक पोलिसाच्या 11 टीम तयार केल्या आहेत. थकीत असलेल्या ई–चलनपैकी 50 टक्के ई–चलन दंड वसूल करण्याचा मानस आहे.  

यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त (वाहतूक) 

2 हजार परवाने केले तात्पुरते रद्द
ई–चलन न भरण्याची संख्या जास्त आहे. त्यासाठी नुकतेच सह पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी परिवहन आयुक्तांची भेट घेतली व ई–चलनबाबत चर्चा केली. ई–चलनचा दंड न भरणाऱ्या 2 हजार चालकांचा वाहतूक परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केला गेला आहे.

कॉल सेंटरमधून जाणार फोन 
ज्या चालकावर ई–चलनद्वारे कारवाई केली आहे त्यांना फोन करून दंड भरण्याची सूचना केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी एक कॉल सेंटर सुरू केले आहे. कॉल सेंटरमधून आतापर्यंत 2 हजार जणांना फोन केले गेले आहे.