
ठेकेदारांच्या जमा असलेल्या डिपॉझिट रकमेमधून तब्बल 111 कोटी 63 लाख बेकायदा पद्धतीने काढल्याप्रकरणी जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बांधकाम खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणात मोठे मासे सापडण्याची शक्यता नितीन भोये जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या निलंबनानंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जव्हारच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याकडे देण्यात आला आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
भोये यांचे निलंबन करण्याचे आदेश विशेष अधीक्षक तथा कोकण विभागाचे मुख्य अभियंता म. शा. कांबळे यांनी दिले आहेत. दरम्यान ही कारवाई समाधानकारक असली तरी या मागील संपूर्ण कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. इतकी मोठी अनामत रक्कम खात्यातून काढली जात असताना लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना नसल्याचा दावा कुणालाही पटण्यासारखा नाही. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.





























































