आचारसंहितेनंतर राज्यात 112 कोटींचा काळा पैसा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळय़ा पैशांवर बारीक नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने 10 मार्च ते आतापर्यंत राज्यभरातून तब्बल 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त केला आहे.

निवडणूक आयोगाच्या या पथकाने केलेल्या कारवाईत 4.81 कोटी रुपयांची सोने-चांदी जप्त करण्यात आली. तर 21.24 कोटी रुपयांची दारू आणि 6.12 कोटी रुपयांचे ड्रग्जही ताब्यात घेण्यात आले. पैसा आणि दारूचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेच या कारवाईतून समोर आल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, हा पैसा नेमका कुठून कुठे जात होता याची नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची काळय़ा पैशांवर कडक नजर आहे. मुंबईत सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि दारूची मोठय़ा प्रमाणावर ने-आण होण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे.