
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) देशभरातील औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीडीएससीओच्या रिपोर्टनुसार, देशभरातील 112 औषधांचे नमुने गुणवत्ता चाचणीत फेल झाले आहेत. सर्वाधिक 49 औषधे हिमाचल प्रदेशातील असून 16 औषधे ही गुजरात, 12 औषधे उत्तराखंड, 11 औषधे पंजाब, 6 औषधे ही मध्य प्रदेशातील आहेत. जी 112 औषधे निकृष्ट दर्जाची आढळली आहेत. त्यातील 3 औषधे ही खोकल्याच्या सिरपची आहेत.
देशभरातील केंद्रीय आणि राज्यस्तरीय प्रयोगशाळांमध्ये 52 औषधे मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरली, तर 60 औषधे राज्यस्तरीय मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरली. निकृष्ट दर्जाच्या औषधांमध्ये हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, संसर्ग, वेदना, जळजळ, अशक्तपणा आणि अपस्मार यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी या औषधांचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच पंजाब सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपसह आठ औषधांच्या वापरावर बंदी घातली.




























































