
अहमदाबाद विमान अपघाताच्या चार दिवसानंतर तब्बल 112 वैमानिक सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व वैमानिक एकाचवेळी आजारी पडल्याचे कारण देण्यात आले आहे. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी आज लोकसभेत याबाबतची माहिती दिली. 16 जून रोजी 61 वरिष्ठ वैमानिक आणि 51 उड्डाण अधिकाऱयांनी रजेसाठी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. अशा भीषण अपघातानंतर वैमानिकांचे मानसिक आरोग्य राखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आता विमान पंपन्यांना वैमानिकांसाठी एक विशेष कृती दल तयार करण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही उड्डाण मंत्र्यांनी सांगितले. दुसरीकडे डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला 4 कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
कर्तव्य आणि नियमांचे उल्लंघन
डीजीसीएने 23 जुलै रोजी एअर इंडियाला नोटिसा बजावल्या. या नोटिसांना आम्ही निर्धारित वेळेत उत्तर देऊ. सध्या आमचे प्राधान्य आमच्या क्रू आणि प्रवाशांची सुरक्षा याला आहे असे एअर इंडियाने म्हटले आहे. डीजीसीएने यापुर्वीही पंपनीला नोटिसा बजावल्या होत्या. 20 जून रोजी तीन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या.