पंढरपूरातून श्रमिक विशेष रेल्वेने 1159 मजूर लखनौकडे रवाना

399

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये  विविध ठिकाणी अडकलेले उत्तरप्रदेश येथील 1159 नागरीकांना पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वेने लखनौकडे रवाना करण्यात आले.

पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन आज सायंकाळी 5  वाजता उत्तर प्रदेशातील लखनौकडे  1159 मजूर रवाना करण्यात आले. उत्तरप्रदेशात स्वगृही परतणाऱ्या नागरीकांना उत्तरप्रदेश शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर  जिल्हाप्रशासनाने  यादी तयार करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशकडे जाण्याऱ्या विशेष रेल्वेचे नियोजन केले. त्यानुसार आज उत्तरप्रदेश येथील  लखनौकडे नागरीकांना विशेष श्रमिक रेल्वेने रवाना करण्यात आले.

यावेळी सर्व प्रवाश्यांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रशासनाकडून रेल्वेमध्येच  पाणी व जेवणाच्य पाकिटांची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात सामाजिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकात संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. सदर रेल्वे उत्तर प्रदेशातील लखनौ येथे गुरुवारी सायंकाळी 8.15 वाजता पोहचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1159 नागरीकांना स्वगृही जाण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील पंढरपूर 515, मंगळवेढा-80, करमाळा 91, सांगोला 95 आणि माळशिरस 378  या तालुक्यातील 1159 नागरीकांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन  स्वगृही रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाश्यांनी प्रशासनाने केलेल्या सोयी-सुविधा आणि स्वगृही जाण्याचा आनंद व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या