
अंबरनाथ नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसची युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. त्यामुळे नैतिकतेचा दिखावा करीत भाजपने काँग्रेस बरोबर युती तोडली आणि नेहमीच्या स्टाईलने अंबरनाथमध्ये ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षच फोडला. शहरातील काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांसह नवनिर्वाचित १२ नगरसेवकांनी आज नवी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले हे सर्वच नगरसेवक कमळाबाईच्या तंबूत दाखल झाल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपला सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गटाला जोरदार धोबीपछाड दिली. त्यामुळे नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुले या निवडून आल्या. त्यानंतर भाजपने सत्तेत शिंदे गटाला सहभागी करून घेण्याऐवजी काँग्रेसबरोबर युती केली. या युतीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सर्व १२ नवनिर्वाचित नगरसेवकांची हकालपट्टी केली. या कारवाईनंतर प्रदीप पाटील, दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड यांनी आज नवी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवत भाजपने काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यातून सारवासारव करण्यासाठी भाजपने काँग्रेसशी झालेली युती तोडली. मात्र बकासुरी स्टाईलने अंबरनाथमधील सर्व काँग्रेस पक्षच गिळंकृत केला.
































































