
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिमतीला 12 कोटींची नवी मर्सिडीज कार आली आहे. मोदी आतापर्यंत लॅण्ड क्रूझर नाहीतर रेन्ज रोव्हर वापरत होते, मात्र आता त्यांना मर्सिडीज देण्यात आली आहे. ही कार बुलेटप्रूफ तर आहेच, पण गाडीपासून दोन मीटर अंतरावर बॉम्ब जरी फुटला तरी तिला साधा ओरखडाही पडणार नाही. गॅसहल्ला झाला तरी गाडीत खास ऑक्सिजनची व्यवस्थाही आहे. या आलिशान कारचे टायर पंक्चर झाले तरी ती सुसाट धावू शकते. विशेष म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याही दिमतीला नवी मर्सिडीज बेन्झ स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपने आणली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री ते हिंदुस्थानचे पंतप्रधान असा प्रवास करताना नरेंद्र मोदी यांच्या दिमतीला असलेल्या गाड्याही बदलल्या आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी महिंद्राची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ वापरली. त्यानंतर 2014मध्ये पंतप्रधान म्हणून ते बीएमडब्ल्यूत बसले. दरम्यानच्या काळात बीएमडब्ल्यू मागे पडली आणि लॅण्ड रोव्हर, लॅण्ड क्रूझर दिमतीला आली.




























































