‘सेंट जॉन द बॅप्टिस्ट’चा जन्मोत्सव सुरू असताना अनर्थ घडला; अज्ञाताच्या अंदाधुंद गोळीबारात 12 ठार, अनेक जखमी

फोटो - गुगल

यहूदी धर्मोपदेशक ‘सेंट जॉन द बॅप्टिस्ट’ यांचा जन्मोत्सव सुरू असताना अज्ञात हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यामध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली असून जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

या हल्ल्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात लोक नाचत, गाणे म्हणत ‘सेंट जॉन द बॅप्टिस्ट’ यांचा जन्मोत्सव साजरा करत असताना दिसत आहे. याचवेळी अचानक धाडधाड गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. यानंतर आनंदोत्सवाचे रुपांतर दु:खात होते आणि लोक किंचाळत सैरावैरा धावताना दिसतात.

इरापुआटोचे अधिकारी रोडोल्फो गोमेज सर्वेंटस यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

मेक्सिकोचे राष्ट्रपती क्लाऊडिया शिनबाम यांनी या हल्ल्याची निंदा करत शोक व्यक्त केला. तसेच हल्ल्याचा तपास सुरू असून हल्लोखोरावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, गुआनाजुआटो हे हिंसाचारग्रस्त राज्य असून गेल्या महिन्यात एका चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाला होता.