परभणीत आणखी 12 रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 216 वर

442

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी पहाटे एक, सकाळी दोन आणि दुपारी आलेल्या अहवालात नऊ, असे एकूण 12 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 216 एवढी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच 114 जण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला आहे. संक्रमीत कक्षात आता 92 रुग्ण उपचार घेत आहेत. तर बाहेरील जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2 व्यक्तींवर परभणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये शनिवारी 12 रुग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या गंगाखेड शहरातील 9 रुग्ण आहेत, तर अन्य 3 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये परभणी शहरातील जुना पेडगाव रस्त्यावरील 58 वर्षीय पुरुष, तसेच मध्यवस्तीतील कडबी मंडई भागातील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याप्रमाणेच पहाटे सेलूच्या पोलीस वसाहतीतील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. परभणीच्या कडबी मंडईतील व्यक्ती हा यापूर्वी कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहे. तर जुना पेडगाव रस्त्यावरील आणि सेलूच्या पोलीस वसाहतीतील कोरोनाबाधित रुग्ण नवीन असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

गंगाखेडमध्ये शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ओमनगरमधील 36 वर्षीय पुरुष, योगेश्वरी कॉलनीतील 59 वर्षीय पुरुष, तिवट गल्ली येथील 13 वर्षीय मुलगी, तर 16 वर्षीय मुलगा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात अनुक्रमे 60 व 50 वर्षांचे पुरुष, तर 40, 27 व 77 वर्षीय महिला, असे एकूण 9 रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे. या बाधितांमध्ये 3 डॉक्टर्स आणि एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या