
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या १ हजार २०० कंत्राटी शिक्षकांची यंदाची दिवाळी काळी होण्याची शक्यता आहे. एकीकडे सर्वत्र खरेदीची लगबग सुरू झाली असताना पालघरमधील शिक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. जून ते सप्टेंबरपर्यंतच्या पगाराची ९ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम सरकारने थकवल्याने ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. मुलांची शिक्षणे, घरखर्च, आजारपण, कर्जाचे हप्ते यासाठी पैसे आणायचे तरी कुठून, असा प्रश्न पडला असून शिक्षण विभागाच्या या बेफिकिरीविरोधात शिक्षक संतप्त झाले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या २ हजार २०० प्राथमिक शाळा असून तेथे कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमले आहेत. या शिक्षकांना दरमहा १६ ते २० हजार एवढे मानधन दिले जाते. पण तेदेखील वेळेवर मिळत नसल्याने आम्ही करायचे तरी काय, असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे. राज्य शासनाकडून याआधी १ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी आला होता. त्यातून केवळ मार्च महिन्याचा पगार शिक्षकांना दिला गेला. आता १ कोटी ६१ लाख इतका निधी मिळाला असला तरी तो जिल्हा कोषागारामध्ये पडून आहे. झेडपीकडे हा निधी वर्ग न झाल्याने शिक्षकांना त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
निधी मिळताच वाटप करणार
कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार चार महिन्यांपासून रखडले असल्याची कबुली पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली आहे. ९ कोटी ४० लाखांचा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला असून पैसे मिळताच शिक्षकांना पगाराचे वाटप करण्यात येईल, असे रानडे यांनी सांगितले.
पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता पडू नये म्हणून कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. पण त्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अनेक शिक्षकांनी घरांसाठी तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
दिवाळी लवकरच सुरू होणार आहे. पण हातात पगारच नसल्याने मुलांना कपडे, फराळ व अन्य साहित्याची खरेदी करता येणार नाही. दिवाळीपूर्वी पगार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे