मुंबई शहरासाठी 124 कोटींच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता

520

मुंबई शहर जिल्ह्याच्या 2020-2021 या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 124 कोटी 11 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री व पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत  मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढविण्यासाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज जिमखान्यामध्ये पालकमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी प्रास्ताविक भाषणात बैठकीची माहिती दिली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2020-2021 या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 104 कोटी 72 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 19 कोटी 28 लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेसाठी 11 लाख रुपये अशा एकूण 124 कोटी 11 लाख रुपयांच्या नियतव्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2019-20 या वर्षात वाटप झालेल्या एकूण निधीपैकी डिसेंबर 2019 अखेरपर्यंत सर्वसाधारण योजनेत 115 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे, तर अनुसूचित जाती उपयोजनेत 8 कोटी 91 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित होते. मुंबईचे पर्यटनातील स्थान पाहून विविध प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनीही जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढवून मिळण्याची मागणी केली.

महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. आमदार सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, किरण पावसकर, अमीन पटेल, तमीळ सेल्वन, राहुल नार्वेकर, आमदार मनिषा कायंदे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आदी यावेळी उपस्थित होते.

निधी वाढवण्यासाठी प्रयत्न

2020-21 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 124 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा आहे. हा निधी वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कामांचे प्रस्ताव सादर करावेत. वित्तमंत्र्यांशी चर्चा करून हा निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करू. मुंबई हे देशातील पर्यटन क्षेत्रातील मोठे शहर आहे. हेरिटेज वॉकसारखे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. त्यासंदर्भातही वेगळा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मुंबई शहर जिह्याच्या विकासासाठी सर्वांनी एक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असेही अस्लम शेख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या