सीयूईटीमुळे बारावीतील गुणांना महत्त्व नाही, बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे ऑनलाइन परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षेत (सीयूईटी) मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार असून यामुळे या प्रवेशासाठी बारावीतील गुणांना आता महत्त्व राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना संगणकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. जुलैमध्ये ही परीक्षा होणार असून एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) केंद्रीय विद्यापीठांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटीचे आयोजन करणार आहे. त्यामुळे देशातील 45 केंद्रीय विद्यापीठांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीयूईटीमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरावे लागणार आहेत. यूजीसीचे अध्यक्ष डॉ. जगदीशकुमार यांनी सांगितले, 1 एप्रिलला एनटीए बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या अभ्यासक्रमाची निश्चिती करेल. सीयूटीईमध्ये विद्यार्थ्यांना भाषा विषयाची परीक्षा देणे अनिर्वाय असेल. या परीक्षेचा अभ्यासक्रम एनसीईआरटीच्या बारावीच्या अभ्यासक्रमासारखाच असणार आहे. संगणकावर द्याव्या लागणाऱया या परीक्षेत निगेटीव्ह मार्किंगदेखील ग्राह्य धरले जाणार आहे. परीक्षा अर्जाच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://nta.ac.in/ या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन यूजीसीने केले आहे.