बारावीचे गुण भरण्याची वेबसाईटही जॅम, शिक्षक हैराण, रात्रभर कॉलेजमध्ये मुक्काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन भरण्याची वेबसाईटही जॅम झाली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने शिक्षकांना गुण अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. वेबसाईट अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने हैराण झालेल्या शिक्षकांना रात्रभर कॉलेजमध्ये मुक्काम करून विद्यार्थ्यांचे गुण भरावे लागत आहेत. बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया 23 जुलैला संपणार असून वेबसाईटच्या गोंधळामुळे ही मुदत वाढवून देण्याची मागणी शिक्षक करीत आहेत.

मंगळवारी संध्याकाळपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची संगणकीय प्रणाली खंडित झाली. ती बऱयाच उशिराने म्हणजे आज बुधवारी दुपारी सुरू झाली. मात्र वेबसाईट अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे शिक्षकांना गुण अपलोड करताना मनस्ताप सोसावा लागत आहे. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना, वाहतुकीची साधने नसताना, निकालाचे काम करण्यासाठी बारावीचे शिक्षक शाळा, महाविद्यालयात उपस्थित होते, परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने या शिक्षकांना नुसते बसून राहावे लागत आहे. मुंबईतील काही महाविद्यालयांत तर शिक्षक रात्रभर थांबले होते, पण सर्व्हर डाऊन झाल्याने त्यांचे हे परिश्रम पाण्यात गेले.

बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे. संगणकीय प्रणालीमध्ये गुण भरण्याचे काम खूप कमी प्रमाणात झाले असून ते मुदतीत पूर्ण होणार नाही. 23 जुलैपर्यंतची मुदत अपुरी असल्यामुळे यामध्ये चार ते पाच दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात यावा. – प्रा.मुकुंद आंधळकर, समन्वयक, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

  • मुंबईत बारावीचे जवळपास तीन लाख विद्यार्थी असून त्यापैकी एक लाखाहून अधिक विद्यार्थ्याचे गुण अद्याप भरावयाचे बाकी आहेत.
  • एक लाख विद्यार्थ्यांचे गुण अद्याप अंतिम झालेले नाहीत.
  • राज्यातील तेरा लाख विद्यार्थ्यांपैकी सवापाच लाख विद्यार्थ्यांचे गुण भरावयाचे बाकी असून पाच लाख विद्यार्थ्यांच्या गुणांचे अंतिम निश्चितीकरण व्हायचे आहे.

बारावी निकालाचे 83 टक्के काम पूर्ण

बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम 83 टक्के पूर्ण झाले असून निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले. उर्वरित काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल आणि निकाल वेळेत जाहीर होईल असेही ते म्हणाले.