
2019-21 दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणा दरम्यान वाढत्या प्रदूषणामुळे देशभरात तब्बल 13 टक्के मुले अकाली जन्माला येत असून 17 टक्के मुलांचे वजन कमी भरत असल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयआयटी दिल्ली, आयआयपी अर्थात आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई आणि युके तसेच आयर्लंड येथील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश आणि दादरा तसेच नगर हवेली येथे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण असल्यामुळे तेथील गर्भवतींना त्याचा फटका बसत आहे. हवेतील प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे त्याचा विपरित परिणाम गर्भवती महिलांना मुलांना जन्म देताना सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
हवेत पीएम (पार्टीक्युलेट मॅटर) 2.5 धुलीकणांचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांच्या डिलिव्हरी दरम्यान कमी वजनाची मुले जन्माला येण्याची शक्यता 40 टक्के आणि अकाली डिलिव्हरी होण्याची शक्यता 70 टक्क्यांनी वाढत असल्याचे तसेच पाऊस, तापमान यांचाही मुलांच्या डिलिव्हरीवर विपरित परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणा दरम्यान समोर आले.
याबाबतचा अभ्यास अहवाल ग्लोबल पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. जी मुले उत्तरेकडील जिह्यात राहत आहेत त्यांना सर्वाधिक प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे.