
एसी लोकलचा आरामदायी प्रवास म्हणून तिकिटासाठी जादा पैसे मोजणाऱ्या प्रवाशांना विनातिकीट प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तिकीट काढले नसतानाही ते प्रवासी आसने अडवून बसत आहेत. मागील 13 महिन्यांत एसी लोकलमधून प्रवास करणाऱया विनातिकीट प्रवाशांबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे 11,134 तक्रारी प्राप्त झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्या तक्रारींच्या अनुषंगाने मध्य रेल्वेने एसी लोकलसाठी खास टास्क पर्ह्स स्थापन करून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 25 मे 2024 ते 30 जून 2025 या 13 महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेकडे 11,134 तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तक्रारींचे टास्क फोर्सने पुढील दोन दिवसांत तत्काळ निवारण केले. टास्क फोर्सच्या माध्यमातून झटपट कारवाई केली जात असल्याने विनातिकीट प्रवाशांना जरब बसल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

























































