
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांची मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीमुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यावर कर्मचार्यांवरील कामाचा ताण कमी होईल. या नोकरभरतीसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी निर्णय घेतला होता.
या पदांसाठी मेगाभरती
ग्रामविकास विभागाच्या आस्था 8 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक (पुरुष 50 टक्के), आरोग्यसेवक (पुरुष 40 टक्के), आरोग्यसेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे. ही मेगाभरती राज्यातील सहाही विभागांत होणार असून सर्वाधिक जागा पुणे विभागात 2 हजार 721 आहेत.























































