
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले असून दिवसेंदिवस अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. एप्रिल अखेरीस महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास लाखाच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याची योजना राज्याच्या आरोग्य विभागाने आखली आहे.
याशिवाय 132 ऑक्सिजन प्लांट उभारणे, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व ऑक्सिजन टँकरचीही खरेदी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य उच्चाधिकार समितीला सादर करण्यात आला आहे.
निती आयोगाने तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विविध राज्यांमध्ये एप्रिल अखेरीस किती रुग्ण वाढतील व त्यासाठी किती बेड, अतिदक्षता विभागातील बेड व ऑक्सिजन बेड लागतील याचा आढावा दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी महाराष्ट्रात 30 एप्रिल अखेरीस अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 99,665 होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 16,061 ऑक्सिजन बेड, 2877 अतिदक्षता आणि 1450 व्हेंटिलेटर बेड असावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी आक्सिजन आयात, ऑक्सिजन प्लांट उभारणी, ऑक्सिजन टँकर खरेदी आणि 10 लाख रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीचा 743 कोटी 72 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर केला आहे.
राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. कोरोना रुग्णांसाठी दररोज 1550 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत असून उर्वरीत 400 मेट्रिक टन ऑक्सिजन अन्य राज्यांतून खरेदी करण्यात येते.
महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱया राज्यातही रुग्णांची वाढती संख्या वाढत असल्याने कदाचित त्यांच्याकडून ऑक्सिजन मिळणार नाही.
हे लक्षात घेऊन दररोज 500 मेट्रीक याप्रमाणे 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याची परवानगी मागितली आहे. यासाठी अंदाजे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रति मिनिट 3500 लिटर ऑक्सिजन तयार करणार
ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात 132 प्रेशर स्विंग अॅडसॉपर्शन प्लांट उभारण्यात येणार आहेत. यातून प्रतिमिनिट 600 ते 3500 लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे. ही योजना आरोग्य विभागाची 23 जिल्हा रुग्णालये, 8 सामान्य रुग्णालये, 91 उपजिल्हा रुग्णालये व 10 महापालिका रुग्णालयात राबवली जाणार आहे. 200 कोटी 80 लाख रुपयांची ही योजना आहे.






























































