१४ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील नामांकित अल्पसंख्यांक कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नव्वदीपार विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत दिलासा मिळाला आहे. आज जाहीर झालेल्या या यादीत तब्बल १३ हजार ७३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीतही बडय़ा कॉलेजची कटऑफ ८० टक्क्यांच्या वर क्लोज झाली आहे.

एकूण १ लाख १७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी तिसऱ्या यादीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता त्यापैकी ५४ हजार ७२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. http://mumbai.11thadmision.net या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी centralized allocation result ३ या ऑप्शनवर क्लिक करून आपला ऍप्लिकेशन क्रमांक टाकायचा आहे. विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या कॉलेजची माहिती मिळेल. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास अशा विद्यार्थ्यांनी २ ऑगस्टपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. २ ते १० पसंतीक्रम असलेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा नसेल तर त्यांनी ३ व ४ ऑगस्ट या कालावधीत कॉलेज पसंतीक्रम बदलून त्यांची प्रिंट काढून ठेवावी. पसंतीक्रम बदलायचे नसतील तर पूर्वीचेच पसंतीक्रम ग्राह्य धरून या विद्यार्थ्यांना शेवटच्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट करण्यात येईल.

शेवटची गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला
अकरावी प्रवेशाची शेवटची संधी म्हणजेच चौथी गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी ७ ते ९ ऑगस्टपर्यंत मुदत दिली जाणार आहे. शेवटच्या यादीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनसुद्धा प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे.

कॉमर्सच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज
कॉमर्स शाखेच्या सर्वाधिक ७ हजार ५०९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे तर आर्टस्च्या २ हजार १७७, सायन्सच्या ३ हजार ५७३ आणि एमसीव्हीसीच्या ४७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या कॉलेजची वर्णी लागली आहे. दुसऱ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले एकूण ८ हजार ७९० विद्यार्थी असून तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या पसंतीचे कॉलेज अनुक्रमे ६ हजार ९५५, ५ हजार ८८० आणि ५ हजार २०९ विद्यार्थ्यांना मिळाले आहे तर ६ ते ३० पसंतीक्रम मिळालेले एकूण १४ हजार १६३ विद्यार्थी आहेत.

तिसऱ्या यादीतील प्रवेशाची स्थिती
– एकूण अर्ज – एक लाख १७ हजार २३४
– प्रवेश मिळाला – ५४ हजार ७२७

शाखानिहाय प्रवेश
– आर्टस् – ४,९६२
– कॉमर्स – ३४,७८९
– सायन्स – १,४३९
– एमसीव्हीसी – ५७८

अल्पसंख्याक कॉलेजची कटऑफ ८० च्या वर
केसी, मिठीबाई, एचआर, जयहिंद, एनएम आदी अल्पसंख्याक कॉलेजची कटऑफ तिसऱ्या यादीत ८० टक्क्यांच्या वर क्लोज झाली आहे. केसी कॉलेज आर्टस् ८१.२७, सायन्स ७९.२७, कॉमर्स ८२.३६ , एचआर कॉमर्स ८१.६३, मिठीबाई आर्टस् ७८.१८, कॉमर्स ८०.३६, सायन्स ८१.०९, जयहिंद आर्टस् ८३.६३, कॉमर्स ७९.२७, सायन्स ८२.३६ तसेच रूईया कॉलेजची आर्टस्ची कटऑफ ८८.९० तर सायन्सची कटऑफ ८५.०९ वर क्लोज झाली आहे.