
देशातील महिला, मुली यांची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांचे अपहरण, अत्याचाराच्या रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे महिलांनी एकटे घराबाहेर पडणे आता कठीण होत चालले आहे. अशीच एक धक्कादायक घटना कोलकत्त्यात घडली. येथे एका 14 वर्षीय मुलीवर 3 नराधमांनी मिळून सामुहिक बलात्कार केला. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
रिपोर्टनुसार, 7 वीत शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी ट्युशन क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली. क्लासेसला जात असताना रस्त्यात तिला दोनजण भेटले. यापैकी एक जण मुलीचा ओळखीचा असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आणखी एक व्यक्ती त्यांच्या टोळीत सामिल झाला आणि या तिघांनी मिळून त्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने रिक्षात बसून मोतीलाल कॉलनीतील एका घरात नेले. त्या तीन नराधमांनी त्या 14 वर्षीय विद्यार्थींवर बलात्कार केला, असे पोलीस अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, विद्यार्थीनीने मोठे धाडस दाखवून घटनास्थळावरून पळ काढला. ज्यावेळी ती घरी पोहोचली तेव्हा ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. घरी पोहचल्यावर मुलीने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी कुटुंबियांनी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. तिन्ही आरोपींवर POSCO आणि भारतीय न्याय संहिताच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.


























































