अंबाबाई देवस्थान परिसराच्या 143 कोटींच्या विकास आराखडय़ास मान्यता; किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर करणार

देशविदेशातील असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई  देवस्थान परिसराच्या 143 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास आराखडय़ास आज राज्याच्या नियोजन विभागाने मान्यता दिली आहे.

महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडय़ाचा सुमारे 1 हजार 445 कोटी 97 लाख रुपये किमतीचा प्रस्ताव 15 जुलै 2025 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. त्यापैकी 143 कोटी 90 लाख रुपयांच्या प्रस्तावास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे.

तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण

विकास आराखडय़ातील कामांची अंमलबजावणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही कामे 31 मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मंदिर दुरुस्ती संवर्धन

मंदिर विकास आराखडय़ात मंदिर दुरुस्ती व संवर्धन, किरणोत्सव मार्गातील अडथळे व अतिक्रमण निर्मूलन करण्यात येणार आहे.

विकास आराखडय़ात कोणती कामे होणार

मंदिर परिसरात सुमारे साडेबाराशे भाविकांच्या क्षमतेचे दर्शन मंडप, शौचालय पिण्याचे पाणी, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था, व्हिनस कॉर्नरजवळ भक्त निवास उभारण्याची योजना आहे. यामध्ये भक्तांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. बहुमजली वाहनतळ, डायनिंग हॉल, मंदिराभोवती पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग अशी विविध योजना आहेत.