मुंबईतल्या साडेचौदा हजार इमारती धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई शहरातल्या हद्दीतील साडेचौदा हजार 858 सेस इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यातील 16 इमारती अतिधोकादायक आहे, पण तरीही रहिवासी या इमारती रिकाम्या करण्यास तयार नाहीत. इमारत रिकाम्या केल्या तर वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडण्याची वेळ येईल या भीतीने रहिवासी जीवावर उदार होऊन जुन्या-मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करून आहेत.

डोंगरीतील कौसरबाग इमारत दुर्घटनेनंतर मुंबईतल्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील बहुतांश इमारती 70 ते 80 वर्षे जुन्या आहेत. देखभालीअभावी या इमारतींची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी म्हाडाने साडेचौदा हजार 585 इमारती धोकादायक जाहीर केल्या आहेत. यातील बहुतांश इमारती मुंबई शहराच्या हद्दीत आहेत. त्यामुळे मोक्याच्या जागेवर असलेल्या रिकाम्या करण्यास रहिवासी तयार नाहीत. संपूर्ण दक्षिण मुंबईतील जुन्या व उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे.

सुमारे म्हणजे सुमारे पाच ते सवापाच हजार जुन्या इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. पण अजूनही चौदा हजारांहून अधिक इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील बहुतांश इमारतींची देखभाल होत नाही. मालक व रहिवाशांमध्ये प्रचंड वाद आहेत. या जुन्या इमारतींमधील रहिवाशांना अतिशय कमी भाडे भरावे लागते. 200 ते 300 रुपये भाडे आहे. दक्षिण मुंबईसारख्या मोक्याच्या जागेवर एवढय़ा कमी भाडय़ात या रहिवाशांना राहायला जागा मिळते. त्यामुळे कोणी सहजासहजी जागाही विकत नाहीत. या जागा विकल्या तर मालकाला ट्रान्सफर फीमधून काही पैसे मिळतात, पण भाडय़ातून मालकाला काही फायदा होत नाही. त्यामुळे मालक जागेची दुरुस्ती करीत नाही. काही जुन्या इमारतींमध्ये पूर्वीच्या काळात लिफ्ट बांधल्या होता, पण देखभालीअभावी लिफ्टही बंद आहेत. या सर्व उपकरप्राप्त इमारतींच्या स्ट्रक्चरल रिपेअरची (संचरनात्मक दुरुस्ती) तसेच पुनर्बांधणीचीही जबाबदारी वास्तविक म्हाडावर आहे, पण म्हाडाकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे असंख्य इमारतींची स्ट्रक्चरल दुरुस्तीही रखडली आहे. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी व पुनर्विकासासाठी म्हाडाने सेस इमारतींची तीन गटांत वर्गवारी केली आहे. कोणत्या वर्षांत इमारत बांधली त्यानुसार गट केले आहेत.

सेस इमारतींचे तीन गट
– अ गट-बांधकामाचे वर्ष- 1 सप्टेंबर 1940 पूर्वीच्या. या गटातील सध्याची इमारतींची संख्या- सुमारे 12 हजार 025
– ब गट- बांधकामाचे वर्ष- 1 सप्टेंबर 1940 ते 31 डिसेंबर 1950 पर्यंत. या गटातील इमारतींची संख्या- सुमारे 963
– क गट- बांधकामाचे वर्ष- 1 1जानेवारी 1951 ते 30 सप्टेंबर 1969. या गटातील इमारतींची संख्या- सुमारे 1 हजार 294

मुंबईत 14 हजार 207 उपकरप्राप्त इमारती
मुंबईत सध्या 14 हजार 207 उपकरप्राप्त इमारती आहेत. एखादी इमारत मोडकळीस आली असेल, पण मालक अशा इमारतीचा पुनर्विकास तयार करण्यासाठी तयार होत नसेल तर अशा इमारतीचा म्हाडाच्या माध्यमातून विकास केला जाईल, अशी घोषणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.