मध्य रेल्वेवर 15 डबा लोकल , ट्रेनच्या विस्तारापुढे प्रश्नचिन्ह; सहाय्यक लोको पायलटशिवाय गाड्या चालवण्यास मोटरमनचा विरोध

मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वे प्रशासन प्रवासी सुरक्षेबाबत खडबडून जागे झाले आहे. त्यादृष्टीने रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी मुंबई दौऱयावर येऊन 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणार असल्याचे संकेत दिले. मात्र सहाय्यक लोको पायलट दिल्याशिवाय अतिरिक्त एकही 15 डबा लोकल ट्रेन चालवणार नाही, अशी ठाम भूमिका मध्य रेल्वेवरील मोटरमननी घेतली आहे. त्यामुळे 15 डबा लोकल ट्रेनचा विस्ताराच्या योजनेपुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

मध्य रेल्वेवर सर्वप्रथम 15 डबा लोकलची सेवा सुरू केली त्यावेळी 15 ऑक्टोबर 2012 रोजी मान्यताप्राप्त संघटनांसोबत संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत 15 डबा लोकल ट्रेनचा समावेश करण्याआधी सहाय्यक लोको पायलटच्या मागणीचा विचार केला जाईल, असे ठरले. मात्र आता मध्य रेल्वेने सहाय्यक लोको पायलट देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत अतिरिक्त 15 डबा लोकल ट्रेनची योजना आखल्याने मोटरमन नाराज आहेत. सहाय्यक लोको पायलटशिवाय नवीन 15 डबा लोकल ट्रेन चालवणार नाही, असा इशारा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.