
सामना प्रतिनिधी । ठाणे
डोंबिवलीकर प्रवाशांच्या सेवेत उद्या रविवारपासून 15 डब्यांच्या लोकल दाखल होणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली दरम्यान 15 डब्यांच्या दोन लोकल फेर्या सुरू होणार आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यानच्या 15 डब्यांच्या चार फेर्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीने ओसंडून वाहणार्या कल्याण आणि डोंबिवलीकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
ठाण्यापल्याड लोकल सेवेवर सध्या असह्य ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सात वर्षांपूर्वी 15 डब्यांची एक लोकल सुरू केली, पण त्यात आजतागायत वाढ केली नसल्याने ठाण्यापुढे लोकल भरगच्च भरून धावत आहेत. अति गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून प्रवासी मृत्युमुखी तसेच आयुष्यभरासाठी दिव्यांग झाल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांसाठी 15 डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत होते. या मागणीला यश येऊन डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर रविवार 3 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकलच्या दोन फेर्या सुरू होत आहेत. त्याचप्रमाणे सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर धावणार्या 15 डब्यांच्या गाडीच्या फेर्यांमध्येही वाढ करण्यात आली असून 12 डब्यांच्या गाडीच्या चार फेर्यांचे रुपांतर 15 डब्यांच्या गाडीत करण्यात आले आहे.



























































