डेब्रिज माफियांना उरणमध्ये दणका; 15 हायवा गाड्या जप्त, वनविभागाच्या धडक कारवाईने भागमभाग

पर्यावरणाला हानीकारक ठरणारे मुंबईतील डेब्रिज बेकायदेशीररीत्या उरण येथील वनविभागाच्या जागेत टाकले जात होते. याबाबत माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत 15 हायवा डंपर एकाच दिवशी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे हायवा चालकांची चांगलीच भागमभाग झाली असून या तडाख्याने मुंबईतील डेब्रिजमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मुंबईतील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील जागा मिळेल त्या ठिकाणी टाकले जात आहे. या डेब्रिजमध्ये पर्यावरण व नागरिक, जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या धोकादायक घटकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यानंतरही विविध शासकीय विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नजरा चुकवून मोठ्या प्रमाणावर मुंबईतील डेब्रिज आणण्यात येते. मुंबईतून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या या बेकायदेशीर डेब्रिजमुळे मात्र नवी मुंबई, पनवेल, उरणमधील काही ठिकाणी डेब्रिजचे डोंगरच निर्माण झाले आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने डेब्रिजमाफियांचे फावले होते. रविवारीदेखील उरण परिसरातील वनविभागाच्या जागेत अशाच पद्धतीने डेब्रिज टाकले जात होते. याबाबत माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत 15 हायवा गाड्या ताब्यात घेल्या आहेत.

पनवेल न्यायालयात धाव
वनविभागाच्या गव्हाण सर्व्हे नंबर 351, 352 जागेत अवैधरीत्या डेब्रिज टाकणाऱ्यांचे काम सुरू होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून 15 हायवा डंपर ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या डंपरमालकांवर वन अधिनियमानुसार गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या 15 हायवा डंपरवर जप्तीच्या कारवाईसाठी प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक पनवेल न्यायालयात प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उरण वनक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी दिली.