
सामना प्रतिनिधी । मुंबई
विकेण्डचा मुहूर्त साधून शनिवारी लालबागमध्ये 15 लाखांहून अधिक भाविकांनी लालबागचा राजासह, गणेशगल्ली, तेजुकाया मॅन्शन, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळमधले नरे पार्क, लाल मैदान आणि लक्ष्मी कॉटेज या गणपतींचे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी लाख लाख दंडवत घालत भाविकांनी बाप्पाचे मनमोहक रूप डोळ्यांत साठवून घेतले. मुंबईसह उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, कसारा इतकेच नाही तर संभाजीनगर, कोल्हापूर, गुजरात, बडोदा, कानपूर, मध्य प्रदेशातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते.
मुखदर्शन असो किंवा चरणस्पर्श, दिवसभरात लाखो भाविकांनी तासन्तास रांगांमध्ये उभे राहून बाप्पाचे दर्शन घेतले. मुखदर्शनासाठीही रांगांमध्ये दीड ते दोन तास जात होते तरीही भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नव्हता. बाप्पाचे दर्शन होताच सगळा थकवा निघून गेल्याचे बदलापूरहून बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या सुदर्शन पाटील आणि वृंदा पाटील यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे तारांबळ
संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर कडक ऊन असल्याने अनेकांनी घरातून बाहेर पडताना छत्र्याच घेतल्या नव्हत्या. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकजणांनी आडोसा शोधण्यासाठी पळ काढला, तर रांगांमध्ये उभ्या असलेल्या भाविकांना भिजतच बाप्पाच्या दर्शनाची वाट पाहावी लागली.
– ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटींची गर्दी होत आहे. शनिवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश धर्माधिकारी यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. रविवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी तर सोमवारी महानायक अमिताभ बच्चन लालबागचा राजाचे दर्शन घेतील.
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे मंदिरासमोरील प्रांगणात शनिवारी महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अभिनेत्री अनिता दाते-केळकर, अभिज्ञा भावे, श्रेया बुगडे-सेठ यांच्यासह विविध मंडळे आणि घराघरातून महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, सुमंत घैसास, आनंद राव, संजय सावंत, सुबोध आचार्य, गोपाळ दळवी, महेश मुदलीयार, वैभवी चव्हाण, पंकज गोरे, विशाखा राऊत, भारत पारीख आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेंद्र दहीबावकर उपस्थित होते.































































