परळीतल्या आंदोलकांनी केले मराठा आरक्षणाचे स्वागत, पण उपोषण सुरुच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तब्बल 21 दिवस परळीमध्ये झाले हे आंदोलन राज्यभर पसरले. आज मराठा आरक्षण जाहीर करण्यात आले त्याचे निश्चितच स्वागत आहे. मात्र आमच्या अन्य महत्वपूर्ण मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे परळीतील उपोषण सुरुच ठेवणार असल्याची भुमिका आंदोलकांनी जाहीर केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.परळीतील आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस होता. आज नाग-पिंप्री या गावातील मराठा बांधवानी साखळी उपोषणात सहभाग नोंदविला.

मराठा समाजाच्या विविध मागण्या शासनाने आजपर्यंत ही विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे परळीत मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने पुन्हा रोखठोक आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. 29 नोव्हेंबर रोजी शासनाने आरक्षण जाहीर केले त्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु कोपर्डी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी व बँकांना फाईल करण्याची सक्ती करावी, आंदोलनाच्या दरम्यान शहीद झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत करावी, आंदोलनात उतरलेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात या मागण्या मंजूर होईपर्यंत परळीत आंदोलन सुरू राहणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक अमित घाडगे, देवराव लुगडे, शंकर कापसे, धनंजय कराळे आदींनी जाहीर केले आहे.