1607 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 57964 मोफत पाठ्यपुस्तकांचे संच; शाळेच्या पहिल्या दिवशी होणार वाटप

541

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1389 जिल्हा परिषद व 218 अनुदानित अशा एकूण 1607 शाळामधील पहिली ते आठवीपर्यंतच्या 57 हजार 964 मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे संच वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यावर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही सर्व पुस्तके तालुकास्तरावर वितरित करण्यात आली असून 12 जूनपर्यंत शाळा स्तरावर पोहोचणार असल्याची माहिती समग्र शिक्षा विभागाकडून देण्यात आली. तसेच पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

समग्र शिक्षातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1389 जिल्हा परिषद आणि 218 अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना 57964 एवढे मोफत पाठ्यपुस्तक संच मिळावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालभारती विभागाकडे केली होती. बालभारतीकडून हे पुस्तक संच तालुक्याच्या ठिकाणी वितरित करण्यात आले आहेत. लॉकडाऊन कालावधी संपला की शासनाने शाळा सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे तालुकास्तरावर प्राप्त झालेले हे पुस्तक संच केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पोहचविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. शाळेचा पहिला दिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले ते पाचवीपर्यंत मुलांसाठी 33 हजार 995 पुस्तक संच तर सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 23 हजार 969 पुस्तक संच असे एकूण 57 हजार 964 पुस्तक संच उपलब्ध आहेत. हे संच शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना वितरित करून शाळेत हा दिवस पुस्तक दिवस साजरा केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या