
सिंगापूर, चीन, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये झपाटय़ाने वाढणाऱ्या कोरोनाने आता हिंदुस्थानमध्येही चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्र बाधितांमध्ये 162 रुग्णांसह आघाडीवर असल्याची चिंताजनक स्थिती आहे. मुंबईत 106 रुग्ण आहेत. त्यामुळे लक्षणे असलेल्यांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा आणि स्वतःला इतरांपासून दूर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मार्च 2020 मध्ये मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाने दोन भयंकर लाटा आणि एका सौम्य लाटेनंतर काढता पाय घेतला. यासाठी वेगाने केलेले लसीकरण महत्त्वपूर्ण ठरले. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा 106 वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 16 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याने धोका नसल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 168 वर पोहोचला आहे. तर मुंबईसह चेन्नई आणि अहमदाबादमध्ये वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे.
असे वाढले रुग्ण
– सध्या महाराष्ट्र, तामीळनाडू आणि केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. 19 मे रोजी केरळमध्ये 69 असणारी रुग्णसंख्या आता 95 वर गेली आहे. तामीळनाडूमध्ये 66 सक्रिय रुग्ण आहेत, जे गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत दुप्पट आहे. तर महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आता 106 वर पोहोचली आहे.
– आपल्याकडे पुरेसे बेड तैनात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर पुण्यातही एका 87 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नायडू हॉस्पिटलमध्ये 50 बेडचा कोरोना वॉर्ड तैनात करण्यात आला आहे.
नव्या व्हेरिएंटची अशी आहेत लक्षणे…
सिंगापूरमध्ये आढळणारे कोरोनाचे रुग्ण एलएफ.वन, एनबी.वन आणि जेएन.1 या प्रकारातील आहेत. या व्हेरिएंटमध्ये नाकातून पाणी येणे, ताप येणे आणि घसा खवखवणे यांचा समावेश आहे. तसेच काही रुग्णांमध्ये खोकला आणि डोकेदुखीदेखील दिसून येत आहे.
पालिकेने अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 100 खाटांचा कोविड वॉर्ड तैनात केला आहे. यामध्ये 20 खाटा मुलांसाठी, 20 खाटा गरोदर महिलांसाठी आणि 60 खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
बंगळुरूत नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोना
बंगळुरूतील नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये बाळाची चाचणी पॉझिटिव्ह आली, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सांगितले. बाळाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर बंगळुरूच्या कलासिपल्या येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असेही सांगण्यात आले.
सिंगापूर, थायलंड, हाँगकाँगमध्ये उद्रेक
– सिंगापूरमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आठवडय़ात कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 200 वर पोहोचली आहे. या ठिकाणी दररोज किमान 100 हून जास्त रुग्ण आढळत आहेत.
– थायलंडमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. तर हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून देशात 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.