कोल्ड्रिफ सिरप घेऊ नका, महाराष्ट्र एफडीएने केले सावध! मध्य प्रदेश आणि राजस्थानात 17 मुले दगावली

कोल्ड्रिफ सिरप या औषधामुळे मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये 17 चिमुकल्यांचा जीव गेल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर सर्वच राज्ये सतर्क झाली आहेत. मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले एसआर-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप अजिबात वापरू नका, असा सावधानतेचा इशारा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे.

तामीळनाडूच्या कांचिपुरम जिह्यातील श्रेसन फार्माच्या कोल्ड्रिफ सिरपमुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील 14 तर राजस्थानातील 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर झालेल्या चौकशीत या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोन हा विषारी घटक आढळून आला. तो शरीरात गेल्यामुळे किडनी खराब होऊन मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र एफडीएने निवेदन प्रसिद्ध करून कोल्ड्रिफ सिरपची विक्री, वितरण आणि वापर तात्काळ थांबवण्याचे आवाहन विव्रेते व ग्राहकांना केले आहे. एफडीच्या सर्व निरीक्षकांनी व सहाय्यक आयुक्तांनी घाऊक व किरकोळ विव्रेते आणि रुग्णालयांना या सिरपचा उपलब्ध स्टॉक सील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एफडीएचे अधिकारी तामीळनाडू औषध प्रशासनाच्या संपर्कात असून पुरवठा साखळीचा शोध घेऊन पुढील वितरण थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती एफडीएने दिली आहे.

कंपनीवर गुन्हा, डॉक्टरला अटक

कोल्ड्रिफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या म्त्यू प्रकरणी मध्य प्रदेशातील प्रवीण सोनी या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तर, औषध निर्माती कंपनी श्रेसन फार्मा या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्याकडे हे सिरप आहे, मग कॉल करा!

सर्वसामान्यांपैकी कोणाकडेही एस-13 बॅचचे कोल्ड्रिफ सिरप असल्यास त्यांनी 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावरून एफडीएशी संपर्क साधावा किंवा jch [email protected] यावर मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.