
सामना प्रतिनिधी । मुंबई
1 ऑगस्ट रोजी जाहीर होणार्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसर्या म्हणजेच शेवटच्या गुणवत्ता यादीसाठी आर्टस्, कॉमर्स, सायन्स आणि एचएसव्हीसी शाखेच्या एकूण 1 लाख 8 हजार 217 जागा शिल्लक आहेत. कॉलेज ऍलॉट न झालेले, पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त इतर पसंतीक्रमाचे कॉलेज ऍलॉट झाल्यामुळे प्रवेश न घेतलेले विद्यार्थी तिसर्या यादीसाठी उद्या 27 व 29 जुलै या दिवशी कॉलेज पसंतीक्रम पुन्हा भरू शकतात. अद्याप ऑनलाइन प्रवेश अर्ज न भरलेले विद्यार्थीही या यादीसाठी नव्याने अर्ज करू शकतात.
ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या व दुसर्या गुणवत्ता यादीत मिळून एकूण 65 हजार 208 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. यापैकी केवळ 48 हजार 864 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. 16 हजार 344 विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीच्या कॉलेजकडे पाठ फिरवली आहे. या विद्यार्थ्यांना आता विशेष फेरीतच प्रवेशाची संधी मिळणार आहे.
ऑनलाइन, कोट्याद्वारे 1 लाख 32 हजार विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया आणि इनहाऊस, व्यवस्थापन तसेच अल्पसंख्याक कोट्याद्वारे आता 1 लाख 31 हजार 310 विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश झाले आहेत. यात बायफोकल, ऑनलाइन गुणवत्ता यादी 1 व 2 मध्ये एकूण 95 हजार 526 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत 2 लाख 12 हजार 407 विद्यार्थ्यांना कॉलेज ऍलॉट झाले होते, तर कोट्याद्वारे 35 हजार 784 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
शेवटच्या यादीसाठी शाखानिहाय उपलब्ध जागा
शाखा प्रवेशक्षमता
आर्टस् 14,260
कॉमर्स 55,701
सायन्स 35,674
एचसीव्हीसी 2,582
आतापर्यंत झालेले प्रवेश
इनहाऊस 8114
अल्पसंख्याक 24,906
मॅनेजमेंट 2764
बायफोकल 6384
प्रवेश फेरी-1 61,891
प्रवेश फेरी-2 27,451

























































