ठाण्यात खड्ड्यांमुळे 18 जणांचा मृत्यू, हायकोर्टाने ठाणे महापालिकेला फटकारले

ठाण्यातील खड्डय़ांमुळे विविध अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला असून हायकोर्टाने याची गंभीर दखल घेत आज ठाणे पालिकेला फटकारले. रस्त्यांची तुम्ही योग्य ती देखभाल का करत नाही, असा सवाल करत ही परिस्थिती सुधारण्यासाठी पुढच्या मान्सूनची वाट पाहायला लावू नका अशी तंबी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ठाणे पालिकेला दिली. ठाण्यातील घोडबंदर मार्गाच्या दुर्दशेवर बोट ठेवत सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सुनावले.

उच्च न्यायालयाने 2018 साली खड्डे व उघडय़ा मॅनहोल्सच्या प्रश्नावर विविध निर्देश दिले होते. त्याला अनुसरून रस्त्यांची देखभाल करण्यात पालिका अपयशी ठरल्या, असा दावा करीत अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. ही याचिका खंडपीठाने निकाली काढली. मात्र उघडय़ा मॅनहोल्सचा प्रश्न कायम असून डोंबिवलीतील 13 वर्षीय मुलाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती.