
सामना ऑनलाईन । मुंबई
बेस्टच्या डिझेलवर धावणाऱ्या बसला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. यानंतर या संचाच्या 184 बसगाडय़ा तपासणीचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. टाटा कंपनीच्या डिझेल बसला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्याचा अहवाल शुक्रवारी बेस्ट समितीमध्ये सादर करण्यात आला. आगीच्या अशा घटनांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरू नये म्हणून बेस्ट प्रशासानने काय पावले उचलली, असा मुद्दा सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी मांडला. बेस्टच्या चालकाने हॉटेलमधील फायर उपकरण आणून आग विझविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चालकाचे कौतुक करायला हवे, असे सदस्य आशीष चेंबूरकर, अनिल कोकीळ यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केली.



























































