अकोल्यात आढळले कोरोनाचे 19 रुग्ण, एकाचा मृत्यू

760

 अकोला जिल्ह्यात आज कोरोनाचे 19 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 144 झाली आहे. आज एक कोरोना रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. 

रविवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे 185 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 166 अहवाल निगेटीव्ह तर 19 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शनिवारी रात्री आणखी  10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर काल रात्रीच एका  60 वर्षीय महिलेचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 397 झाली आहे. तर आजअखेर प्रत्यक्षात 144 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

आजपर्यंत एकूण 3707 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 3459 तर फेरतपासणीचे 109 व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 139 अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 3310 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 397 आहेत. तर आजअखेर 114 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज 19 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात  185 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 19 अहवाल पॉझिटीव्ह आलेत तर 166 निगेटीव्ह. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णांत चार महिला व पाच पुरुष आहेत. त्यातील पाच जण तेल्हारा येथील आहेत. तर उर्वरित राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट येथील रहिवासी आहेत. तेल्हारा येथिल रुग्ण हे मुंबईहून आलेले असून ते अकोला येथील गितानगर मधील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते.

तर, आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष व तीन महिला आहेत.  त्यातील एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी सात जण हे न्यु तारफैल येथील रहिवासी आहेत. तर अन्य शासकीय गोदाम सिंधी कॅम्प, अशोक नगर, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.

144 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार

आता सद्यस्थितीत 397  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 24 जण (एक आत्महत्या व 23 कोरोनामुळे) मयत आहेत.  तर काल (दि.23) रात्री दहा जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता एकूण व्यक्तींची संख्या 229  झाली आहे. तर सद्यस्थितीत 144 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या