
महापालिका निवडणुकीत नशीब आजमावणाऱया उमेदवारांसाठी 19 पानी फॉर्म भरावा लागत असल्याने भावी नगरसेवकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. अर्ज भरताना माहिती चुकल्यास उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बिनचूक अर्जासाठी उमेदवारांनी वकिलांच्या कार्यालयात गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र राज्यात सर्वत्र आहे.
महायुती आणि आघाडीच्या जागा वाटपांची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यातच उमेदवारी मिळणार की नाही याची शाश्वती नाही. तरीदेखील आयत्यावेळी धावपळ नको म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारी अर्जासाठी कागदपत्रांची जमवाजमव करत उमेदवारी अर्ज भरून तयार ठेवण्यास सुरुवात केली आहे. जर का चुकीचा अर्ज भरला तर आणि तो बाद झाला तर निवडणुकीतूनच बाहेर पडावे लागेल, या भीतीने तज्ञ वकिलांची शोधाशोध करावी लागत आहे. अर्ज भरून देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी होत असल्याने भावी नगरसेवकांच्या डोक्याला ताप झाला आहे.
इंग्रजी भाषेत उमेदवारी अर्ज व शपथपत्र सादर करण्याची मुभा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र सादर करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. यासंदर्भात आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात पाठवले आहे. उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्राचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील नमुना विहित करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना मराठी अथवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतून अर्ज करण्याची मुभा द्यावी, असे आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
ही माहिती बंधनकारक
पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यासोबत मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी, खटला असल्यास त्याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात शपथपत्र तयार करण्यासाठी वकिलाची मदत घ्यावी लागत आहे.
नवख्या उमेदवारांची दमछाक
अनेक उमेदवार स्वतः अर्ज भरण्याऐवजी त्यासाठी कायदेशीर सल्लागारांची मदत घेत आहेत. काही ठिकाणी तर एक लाख द्या, अर्ज भरून देतो अशी मागणी होऊ लागली आहे. यामध्ये नवख्या उमेदवारांची तर चांगलीच दमछाक होऊ लागली आहे.































































