
सामना ऑनलाईन, मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जन्मलेला सर्वात वयोवृद्ध वाघ ‘बाजीराव’ याचा शुक्रवारी वार्धक्याने मृत्यू झाला. तो 19 वर्षांचा होता. 2001 मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या जोडीपासून त्याचा जन्म झाला होता. तेव्हापासून तो नॅशनल पार्कमध्येच वाढला. त्याचा रंग पांढरा होता. त्यामुळे नॅशनल पार्कमधील एकमेव दुर्मिळ वाघ म्हणून त्याला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक यायचे असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचे वजन तब्बल 270 किलो. डौलदार चाल, पांढऱ्या रंगामुळे त्याचे सौदर्य आणखीनच खुलून यायचे. भारदस्त. त्याच्या एका डरकाळीने आजूबाजूच्या पिंजऱ्यांतील प्राणीही सैरभैर व्हायचे. इतका रुबाबदार असूनही कर्मचारी किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘बाजीराव’ अशी एक हाक मारली की लगेचच प्रतिसाद द्यायचा. 2001 पासून नॅशनल पार्कात वाढल्यामुळे तो माणसाळला होता. कधीही आक्रमक व्हायचा नाही. अत्यंत शांत. आपल्याच मस्तीत राहणाऱ्या या बाजीरावने सर्वांनाच जिंकले होते. पण या नश्वर शरीराने त्याची साथ सोडली आणि तो कायमचा निघून गेला. अनेक आठवणी मागे ठेवून.
गेल्या चार वर्षांपासून नॅशनल पार्कात रुजू झालेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे सांगत होते. तो इतका माणसाळला होता की त्याला नुसती ‘बाजीराव’ अशी एक हाक दिली तरी तो लगेच प्रतिसाद द्यायचा. कुणीही वाघ सहसा त्याला कितीही पुकारले तरी प्रतिसाद देत नाहीत पण बाजीराव प्रतिसाद द्यायचा. तो अत्यंत शांत होता. त्याला एका जागेवर बसायला कधीच आवडायचे नाही. किमान दोन तास तरी तो फिरून यायचाच. त्याने कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना कधीच त्रास दिला नाही. माणसाला त्याने आपले दुष्मन किंवा प्रतिस्पर्धी कधीच समजले नाही.
दिवसाला 10 किलो मटण फस्त
तब्बल 270 किलो वजन असलेल्या बाजीरावला दिवसाला 8 ते 10 किलो म्हशीचे मटण लागायचे. त्याने अखेरच्या श्वासापर्यंत खाणेपिणे सोडले नाही. अगदी ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्या दिवशीही त्याने मटण खाल्ले.
त्वचेच्या आजाराने हैराण
त्याच्या त्वचेत मेलॅलीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्याचा रंग पांढरा होता. त्याला उन्हाचा प्रचंड त्रास व्हायचा. त्यामुळे त्याला कडक उन्हात सोडण्यात येत नव्हते. सकाळी साडेसात ते साडेदहापर्यंत त्याला बाहेर सोडण्यात येई. बाजीरावही वेळेवर पुन्हा पिंजऱ्यात दाखल व्हायचा.
चार वर्षांपासून होता आजारी
गेल्या चार वर्षांपासून बाजीराव आजारी होता. जुनाट असा संधिवात आणि स्नायूदुखीच्या व्याधीमुळे तो त्रस्त होता. गेल्या दहा दिवसांपासून त्याला चालताही येणे अशक्य झाले होते, परंतु अगदी शेवटच्या दिवसापर्यंत खाणेपिणे सोडले नव्हते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यक बाबींसाठी मार्गदर्शन करणाऱ्या तांत्रिक सल्लागार समितीने या वाघाची पाहणी आणि परीक्षण केले. तसेच वाढत्या वयाचा विचार करून त्याअनुषंगाने काही उपचार सुचवले होते, परंतु वार्धक्याने त्याचे निधन झाले.
वाघांशी नाही, वाघिणींशी पटायचे!
बाजीरावचे वाघांशी कधीच पटले नाही पण वाघिणींशी त्याचे चांगले पटायचे. बाजूच्या पिंजऱ्यात एखाद्या वाघाला ठेवले तर बाजीराव प्रचंड आक्रमक व्हायचा. इकडून बाजीराव आणि तिकडून दुसरा वाघ. दोघेही एकमेकांवर प्रचंड गुरगुरायचे. आपल्या गर्जनांनी सर्व परिसर ते दणाणून सोडायचे. वाघा बॉर्डरवर ज्याप्रमाणे हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या जवानांमध्ये बीटींग रीट्रीट होते त्याप्रमाणे एकमेकांकडे पाहून ते राग व्यक्त करायचे तर दुसरीकडे पांढरा रंग आणि रुबाबदार असल्यामुळे त्याच्याकडे वाघिणी आकर्षित व्हायच्या. बाजीरावलाही वाघिणींचे आकर्षण होते. त्यांच्याबरोबर त्याचे नेहमीच पटायचे. आकर्षण आणि या वाघिणींबद्दल आदर यांमुळे बाजीराव वाघिणींमध्ये मिसळायचा. त्यांच्यावर तो कधीच गुरगुरला नाही.
टॅक्सीडर्मी करणे अशक्य
बाजीरावच्या त्वचेत मेलॅलीनची कमतरता असल्यामुळे त्याची चामडी पांढरी होती. परिणामी, त्याची कातडी तांत्रिकदृष्टय़ा जतन करणे अशक्य होते. त्यामुळे त्याची टॅक्सीडर्मी करणेही शक्य नसल्याचे वन्यजीव जतन तज्ञ डॉ. संतोष गायकवाड यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर त्याच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात वाघाचा मृत्यू
उत्तराखंड येथील जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात एक वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचा अंदाज उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वाघाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनातच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.

































































