लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी आणखी 199 कोटींची उधळण; स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमध्येही जीआर काढून खर्चाला मान्यता

मिंधे सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या केवळ प्रसिद्धीसाठी 199 कोटी 81 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असतानाही मिंधे सरकारने यासंदर्भातील शासन निर्णय काढून या खर्चाला मान्यता दिली. त्यावरून सरकारवर टीका होऊ लागली आहे.

मिंधे सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच 270 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आज त्यातील ‘लाडकी बहीण योजने’च्या प्रसिद्धीसाठी आणखी 199 कोटी 81 लाख 47 हजार 436 रुपये उधळण्यासाठी सरकारने मान्यता दिली. माहिती व जनसंपर्क विभाग महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने या योजनेची जाहिरात या पैशांमधून करणार आहे.

शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही,पण बढाईसाठी भरमसाट खर्च सुरूय
मिंधे सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाहीत, मात्र स्वतःच्या बढाई करण्यासाठी जाहिरातींवर भरमसाट खर्च सुरू आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खूश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे, येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायलाही कमी करणार नाहीत, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.