1 मेपर्यंत महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त! पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aditya-thackeray-mhada

महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे. लोकांच्या सहभागाशिवाय प्लॅस्टिकबंदी यशस्वी होणार नाही. यासाठी लोकांनी प्लॅस्टिक वापरण्याची सवय आणि सोय बदलली पाहिजे, असे सांगत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 1 मे 2020 पर्यंत महाराष्ट्र ‘सिंगल युज डिस्पोजेबल’ प्लॅस्टिक (एकदाच वापरून फेकून देणाऱया प्लॅस्टिक वस्तू) मुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचे शुक्रवारी विधान परिषदेत जाहीर केले.

महाराष्ट्रात 2018 साली प्लॅस्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तूंबाबत (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) कायदा करण्यात आला आहे. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसून सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला. त्याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, प्लॅस्टिक वापरणाऱया नागरिकांना पकडण्याऐवजी त्याचा मूळ स्रोत जप्त केला पाहिजे. संबंधित सर्व विभागांना, अधिकाऱयांना मी सूचना केलीय की, आपल्याला राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षात 1 मेपर्यंत महाराष्ट्र सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त करायचाय. प्लॅस्टिकबंदी नव्हे तर चळवळ उभी करायचीय.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर बंदी नाही

प्लॅस्टिक पिशव्यांमुळे कचरा आणि नाले तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांना परवानगी देता येणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्याला पर्याय म्हणून महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या उत्पादित केल्या जात आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱया पाण्याच्या बाटल्या रिसायकल केल्या जाऊ शकतात. त्याला सिंगल युज मानायचे की नाही यावर चर्चा सुरू आहे. सील बाटल्यांचा वापर अजून सुरू ठेवलाय. त्याला अद्याप पर्याय निर्माण झाला नसल्याने त्या आताच बंद करता येणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पीओपीच्या वापरावर अद्याप बंदी नाही

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीवर बंदी आणणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, हा प्रश्न भावनेशी निगडित आहे. इतक्या लवकर पीओपीवर बंदी आणता येणार नाही. त्यावर वेगळी चर्चा घेऊ. मात्र गणपती सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे मखर बंद करण्यात सरकारला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.