महागाईत जगायचे कसे; पेन्शनवाढीसाठी जंतरमंतरवर एल्गार

तुटपुंज्या निवृत्ती वेतनावर कसे जगायचे? असा सवाल मोदी सरकारला करत आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे ईपीएस 95 राष्ट्रीय समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. पेन्शन वाढवण्याची मागणी लावून धरत विविध राज्यांतून आलेल्या आंदोलकांनी फलक झळकावले.

आतापर्यंत पंतप्रधानांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. निवृत्ती वेतन 1 हजारांहून साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढवणे, महागाई भत्ता, मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, सर्व आश्वासने हवेतच विरली, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

मोदी सरकार असंवेदनशील

मोदी सरकार असंवेदनशील बनल्याची टीका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी केली. उद्या 5 ऑगस्ट रोजीही आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल. सरकारने दुर्लक्ष केले तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने सरकारला देण्यात आला.